किरकोळ वादातून विद्यार्थ्याने शिक्षकावर केला लोखंडी रॉडने हल्ला
 अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध गरुड झेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यानेच शिक्षकावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इतर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने आपल्या ४ ते ५ मित्रांसह शिक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. अकॅडमीतील विद्यार्थी इतर मुलांना त्रास देत असल्याची तक्रार आल्याने एक शिक्षक मध्यस्थीसाठी गेले होते. याचा राग आल्याने संबंधित विद्यार्थ्याने त्यांना शिवीगाळ करत बाहेरून मित्रांना बोलावून घेतले. या टोळक्याने शिक्षकाला घेराव घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मुख्य विद्यार्थ्याने लोखंडी रॉडने शिक्षकाच्या डोक्यावर आणि पाठीवर हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी पोलीस केस केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी शिक्षकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, अपघात झाल्याचे खोटे सांगण्यासाठी आरोपींनी इतर विद्यार्थ्यांनाही धमकावले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, पीडित शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नगर शहरातील प्रसिद्ध अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यानेच शिक्षकावर केला लोखंडी रॉडने हल्ला
- Advertisement -


