अहिल्यानगर -मैत्रीचा गैरफायदा घेत एका 19 वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा सतत पाठलाग करणे, प्रेमसंबंधासाठी बळजबरी करणे आणि नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून शिवगणेश राजू उगले (रा. निर्मलनगर, अहिल्यानगर) याच्यासह त्याचे वडील राजू उगले व आई ऋतुजा उगले यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका महाविद्यालयात सन 2024 मध्ये फिर्यादी युवती शिक्षण घेत असताना तिची ओळख शिवगणेश उगले याच्याशी झाली. सुरूवातीला मैत्रीचे नाते असताना शिवगणेशने युवतीकडे प्रेमाचा तगादा लावला. तिने वारंवार नकार देऊनही त्याने तिचा पाठलाग केला. त्याने युवतीच्या इन्स्टाग्राम आयडी-पासवर्ड घेऊन तिचा छळ सुरू केला. युवतीने 6 ऑक्टोबर 2025 रोजी एका कौटुंबिक वाढदिवसाचे स्टेटस ठेवले असता, शिवगणेशने त्यावरून वाद घालून तिला शिवीगाळ केली. तिने त्याला ब्लॉक करताच, त्याने स्नॅपचॅटवरून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
यापूर्वीही पीडितेच्या कुटुंबीयांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. हा त्रास असह्य झाल्याने कुटुंबीयांनी पीडित युवतीला शिक्षणासाठी श्रीरामपूर येथे नातेवाईकांच्या घरी पाठवले. मात्र, शिवगणेशने तेथेही फोन करून युवतीला व तिच्या मामांना धमकावले. शिवगणेशचे वडिल राजू व आई ऋतुजा उगले यांनी देखील पीडितेच्या कुटुंबीयांना फोन करून शिवीगाळ केली व मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही अशी धमकी दिली. या छळाला कंटाळून अखेर पीडित युवतीने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.


