Monday, October 27, 2025

…तर दुसरा संग्राम जगताप उदयाला येईल ! माजी खासदार डॉ. सुजय विखे नेमकं काय म्हणाले….

अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काही राजकीय भूकंप झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका, असे सूतोवाच भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केले आहे.

भाजप व राष्ट्रवादी महायुती संदर्भात ते म्हणाले, जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीत ९० टक्के समन्वय झाला आहे. मात्र श्रीरामपूरमध्ये शिंदे गट व राष्ट्रवादीतील कोणाशी बोलायचे हा प्रश्न अजून बाकी आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समन्वयक द्यावा अशी विनंती करू, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. नवीन पक्षप्रवेशाबाबत ते म्हणाले, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे असे लोक पक्षात येतील. तसेच काही राजकीय भूकंप झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका.

शिर्डीप्रमाणेच श्रीरामपुरातही महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या (एमएसएफ) माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे. ‘एमएसएफ’चे कर्मचारी प्रत्येक घराशी संवाद साधतील. पुढील वर्षभरात श्रीरामपूर गुन्हेगारीमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. श्रीरामपूरमधील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबत बोलताना सुजय विखे म्हणाले, शेती महामंडळाच्या जागेवर व्यापारी संकुल, बसस्थानक व प्रशासकीय इमारतींची योजना आखली आहे. अहिल्यानगरप्रमाणे श्रीरामपूरलाही उपनगराची गरज आहे.शहरीकरणाचा विस्तार त्या दिशेने करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे बीओटी धोरण रद्द झाल्याने अनेक बसस्थानकांची कामे रखडली आहेत. श्रीरामपूरचा विषय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार असून खास बाब म्हणून दखल घ्यावी, अशी मागणी करू असेही विखे यांनी सांगितले.

…तर दुसरा संग्राम जगताप उदयाला येईल

विकासाच्या मुद्द्यावर मते मिळतात असा आपला समज होता. परंतु लोकसभा निवडणुकीत तो चुकीचा ठरला. काही लोकांनी धर्माच्या नावाखाली जे केले त्याला विधानसभेत उत्तर मिळाले. पूर्वीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विकासाच्या नावावर मतदान होईल, अशी अपेक्षा आहे. जर असे झाले नाही तर जिल्ह्यात ‘दुसरा संग्राम जगताप’ उदयाला येऊ शकतो, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला.

काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्याकडून श्रीरामपूरमधील कामाचे श्रेय घेतले जात असल्याच्या आक्षेपावर सुजय विखे म्हणाले, हेमंत ओगले हे माझे जुने मित्र आहेत. परंतु पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या कामांचे श्रेय इतरांनी घेऊ नये. विरोधी आमदार असूनही श्रीरामपूरसाठी ४ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी दिला आहे. श्रीरामपूरचा विकास हा सामूहिक प्रयत्न आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles