भाजप खासदार कंगना राणौत, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात जोरदार ठुमके लगावले. त्यांनी एकत्रित “ओम शांती ओम” चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर “दीवानगी दीवानगी” धमाकेदार डान्स केला. संसदेत एकमेकांना भिडणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचा एकत्र नाचण्याचा व्हिडिओ पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात या तीन महिला खासदार स्टेजवर एकत्र नाचताना दिसल्या. व्हिडिओमध्ये कंगना राणौत, महुआ मोइत्रा आणि सुप्रिया सुळे “दीवानगी दीवानगी” या गाण्यावर नाचत आहेत, तर नवीन जिंदाल मध्यभागी उभे आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना राणौतनेही नृत्याचा सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.कंगना राणौतने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात नवीन जिंदाल, महुआ मोइत्रा आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत नृत्याचा सराव करताना दिसली होती. तिने पोस्टला कॅप्शन दिले, “सहकारी खासदारांसोबत एक फिल्मी क्षण, हाहा. नवीन जिंदाल जी यांच्या मुलीच्या लग्नाच्या संगीताची रिहर्सल.” राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे हे नेते लग्नासारख्या खासगी कार्यक्रमात इतक्या उघडपणे एकत्र दिसले याचे लोकांना आश्चर्य वाटते.


