Saturday, December 13, 2025

युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जोरदार डान्स ; पहा व्हिडीओ …

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा विवाहसोहळा 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटरमध्ये थाटामाटात पार पडला. युगेंद्र यांनी तनिष्का कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता संपूर्ण पवार कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारसुद्धा तिथे उपस्थित होत्या. युगेंद्र पवार यांची वरात अत्यंत धूमधडाक्यात आली होती. यावेळी युगेंद्र पवारांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी जबरदस्त ठेका धरला होता. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
युगेंद्र पवार यांच्या लग्नात सुप्रिया सुळे अत्यंत आनंदी दिसल्या. त्यांनी स्वत: ठेका धरलाच, शिवाय इतरांनाही नाचण्याचा आग्रह केला. यावेळी त्यांनी फुगडीदेखील खेळली. युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आणि त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यांची पत्नी तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी आहे.
घरात कौटुंबिक कार्यक्रम असला की पवार कुटुंबीय आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र येताना दिसतात. अजित पवार यांनी बंड करून वेगळी चूल मांडल्यानंतरदेखील अनेकवेळा अजित पवार, शरद पवार कौटुंबिक तसंच राजकीय कार्यक्रमात एकत्र दिसलेले आहेत. परंतु युगेंद्र पवार यांनी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत बारामती या मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निडवणुकीत अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे एका प्रकारे प्रतिस्पर्धी मानले जातात.

दुसरीकडे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवार हे या निवडणुकीत जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे अजित पवार युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, असं समजतंय. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles