पुणे : बीडचे निलंबित पोलीस अधिकारी आज रात्री पुण्यात दाखल झाले. आपण पोलिसांकडे सरेंडर होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी खळबळजनक दावा केला. “मतदानाच्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले. वाल्मिक कराडची संत बाळूमामा कंस्ट्रक्शन अंबाजोगाई कंपनी आहे. त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या अकाउंटला 10 लाख आहे. त्यापैकी साडेसात लाख रुपये आले. अडीच लाखांमध्ये माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. पगारातील सेव्हिंग आणि त्यातून माझा खर्च सुरु आहे. राहिलेले अडीच लाखही प्रामाणिकपणे देईन”, असं रणजित कासले म्हणाले.
“मी माजी मंत्री धनंजय मुंडेंची कॅश पकडली होती. तसेच ईव्हीएमजवळ तुम्ही थांबायचं नाही यासाठी माझ्या अकाउंटवर 10 लाख रुपये दिले. वाल्मिक कराड मला भेटले होते. परळीच्या जवळ राखेच्या सेंटरजवळ आमची भेट झाली होती. आमची ज्या मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. मला शांत राहायला सांगितलं होतं. लोकसभेला बोगस मतदार करु दिलं नव्हतं. यावेळी शांत राहा असं सागितलं होतं. बीडचे अॅडीशन एसपी जे चार वर्षांपासून आहेत, एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत ते वाल्मिक कराडचे हस्तक आहेत’, असे गंभीर आरोप रणजित कासले यांनी केले.
रणजित कासलेहा बीडचा निलंबित पोलीस अधिकारी आहे. काल कासले हा दिल्लीहून पुण्यात दाखल झाला होता. नंतर तो पुण्यातील स्वारगेट येथील हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आज पहाटे चारच्या सुमारास कारवाई करत बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं.
आपण पोलिसांना शरण येणार असा व्हिडीओ काल रणजित कासलेनं पोस्ट केला होता. मात्र शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी कारवाई करत पुण्यातून रणजित कासलेला ताब्यात घेतलं. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर कासले याने अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केले होते.
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचाही दावा त्याने केला होता. त्यामुळे बरीच खळबळ माजली होती.
रणजित कासले यांनी काल पुण्यात आल्यावर पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले यांनी केला. त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवलं होतं.


