ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या वर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी: युवराज पाटील
ग्रामपंचायत अधिकारी युनियनची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी
नगर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शेवगाव तालुक्यात भेटी दरम्यान कामात हालगर्जीपणा करणार्या दोन ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याला दोन वेतन वाढी का रोखण्यात येवू नयेत, अशी नोटीस दिली आहे. या कारवाईचे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गात तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांची भेट घेऊन सदर कारवाई तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान यासंदर्भात सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी युनियनच्या शिष्टमंडळास चर्चे साठी वेळ दिली आहे अशी माहिती युवराज पाटील यांनी दिली.
यावेळी विभागीय सचिव राजेंद्र पावसे, ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील नागरे, मा.चेअरमन सतिष मोटे, विलास काकडे, जिल्हा सहसचिव भैय्यासाहेब कोठुळे, राज्य कौन्सिलर संपत गोल्हार व सागर शिनगारे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत ग्रामपंचायत अधिकारी सुभाष गर्जे, अशोक नरसाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.तर प्रशांत बरबडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. अशोक नरसाळे व सुभाष गर्जे यांचे निलंबन रद्द करावे तसेच प्रशांत बरबडे यांच्यावरील प्रस्तावित कारवाई मागे घ्यावी अशी मागणी युनियनने केली आहे.


