विद्यार्थ्यांच्या दप्तरासारखी शिक्षकाने तयार केली स्वतःची टिचर बॅग
टि-बॅग मधून शालेय अभिलेखे व कागदपत्रे यांचे जतन गरजेचे- ॲड.किशोर देशपांडे
अहिल्यानगर-
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (SCERT),पुणे यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा SQUAAF अभियान अंतर्गत येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरासारखे शिक्षकाचेही टि-बॅग हे दप्तर तयार केले आहे.
शिक्षक डॉ.बागुल यांचे वडील श्री सुभाष बागुल यांनी शिलाई केलेली अंदाजे १००० किलो वजनाची, ५ फुट बाय ४ फुट आकाराची प्रतिकात्मक निर्मिती सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमधील महत्वपूर्ण ५१४ पेक्षा अधिक शालेय दस्तऐवजांचा समावेश असलेली टि-बॅग शिक्षणातून सक्षम राष्ट्र उभारणीचा संदेश देते.कॉपीराईट,पेटंट,ट्रेडमार्क,आयएसओ व विविध जागतिक मानांकनासाठी डॉ.बागुल यांनी ही शैक्षणिक निर्मिती पाठवली आहे.
“शालेय अभिलेख विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवण्यापासून ते शाळेतून बाहेर पडण्यापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती ठेवतात.या नोंदींमधून विद्यार्थ्यांना त्यांची उपस्थिती, निकाल, मूल्यांकन व इतर शालेय महत्वपूर्ण बाबी यांसारखी माहिती मिळते.टीचर बॅगमधून या शैक्षणिक घटकांचे पद्धतशीरपणे जतन होणार आहे.”असे प्रतिपादन ॲड किशोर देशपांडे (श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारीणी सदस्य तथा शालेय समिती चेअरमन-माध्य.विभाग,समर्थ प्रशाला) यांनी केले.
“१०२ पटसंख्येचा वर्गशिक्षक म्हणून काम करताना वर्गातील विद्यार्थ्यांविषयीचे शालेय अभिलेख व कागदपत्रेयांचे टिचर बॅग द्वारे केलेले व्यवस्थापन प्रशासकीय कामकाज व इतर बाबींसाठी महत्त्वाचे ठरते.” असे डॉ बागुल यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष श्री दीपक ओहोळ, व्हाईस चेअरमन श्री.श्रीपाद कुलकर्णी,सचिव श्री सुरेश क्षीरसागर,खजिनदार श्री संजय कुलकर्णी,कार्यकारिणी सदस्य श्री सुनील जोशी,श्री स्वप्निल कुलकर्णी,ॲड.श्री वेद देशपांडे,विषय तज्ञ सुलभक प्रा.अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.


