पाथर्डी-तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्या परप्रांतीय सात वर्षीय मुलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, तर मुख्य संशयित आरोपी शिक्षक संजय उत्तम फुंदे (रा. पाथर्डी) हा पसार झाला आहे.त्याचा शोध घेतला जात आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणार्या मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत शिक्षक फुंदे याने तिच्यावर वेळोवेळी अश्लील वर्तन करत अत्याचार केला. पीडित मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर त्याने तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे.
ही घटना पीडितेच्या पालकांनी आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण या चार व्यक्तींना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार न करण्यासाठी दबाव आणला. तक्रार केली, तर येथे राहू देणार नाही अशी धमकी दिली. मात्र, प्रकरण बाहेर आल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात वरील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, अंमलदार संदीप ठाकणे, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, इजाज सय्यद, अक्षय वडते आणि अमोल जवरे यांच्या पथकाने केली.
या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी किसन आव्हाड आणि अॅड. हरिहर गर्जे यांनी पुढाकार घेतला. त्यांना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे व शाहीन शेख यांची मोलाची साथ लाभली. पीडित कुटुंबाला मानसिक आधार देत तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डी येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे. मुख्य संशयित आरोपी शिक्षक संजय फुंदे सध्या पसार असून त्याच्या अटकेसाठी पथक शोधकार्य करीत आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी व खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.


