हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात तापमानाचा उद्रेक झाल्याचे बघायला मिळत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू झाली असून भुसावळ तालुक्यात तापमानाचा पारा 45 अंशा वर जाऊन पोहचल्याचे चित्र आहे. वाढता उन्हाचा पारा लक्ष्यात घेता जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवस पासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा पाच ते सहा अंशाने वाढून तापमान 45 अंशांवर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण तापमान केंद्रावर काल(8 एप्रिल) दुपारी तीन वाजता 45 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याचे मानले जात आहे. तर अजूनही दोन दिवस उष्णतेची लाट अशाच पद्धतीने कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. वाढलेल्या या तापमानात अनेक नागरिकांनी घराच्या बाहेर जाणे टाळले आहे. तर ज्यांना कामानिमित्ताने बाहेर जाणे आवश्यक आहे अशा नागरिकांनी शीतपेय घेण्यासह, अंगभर सुती कपडे वापरून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.
 सध्या विदर्भातील अकोला शहराचे तापमान हे 44 अंश सेल्सिअसच्या वर आहे. तर नागपूरमध्ये देखील पारा 42 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. याचा फटका नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रालयातील वन्य प्राण्यांनादेखील सहन करावा लागत आहे. उन्हामुळे वन्यप्राण्यांना देखील उष्मघाताचा धोका जाणवत असतो. त्यामुळे या उन्हाच्या तडाख्यापासून वन्यप्राण्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराजबाग प्राणीसंग्रालय प्रशासनाने बिबट,अस्वल व पक्षी यांच्या पिंजऱ्यात कुलर लावले आहे. पिंजऱ्याच्या अवतिभवती ग्रीनेट लावून वरच्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे. वाघांसाठी पाण्याचे पाँड तयार करण्यात आले असून सर्व प्राण्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जात असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोटघरे यांनी सांगितले.


