Tuesday, November 4, 2025

सोशल मीडियावरील पोस्टमुळे आक्षेपार्ह यवतमध्ये जमावबंदी लागू, ,पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे : समाजमाध्यमातील आक्षेपार्ह मजकुरामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात शुक्रवारी तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली. माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यवतमधील तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.

दौंड तालुक्यातील यवत गाव परिसरात समाजमाध्यमातील आक्षेपार्ह मजकुरामुळे शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास तणाव निर्माण झाला. दोन गट समोरासमोर आले. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. या घटनेची माहिती यवत पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. जमावाकडून घरे, दुकाने, तसेच प्रार्थनास्थळावर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणारा युवक गावातील सहकारनगर भागात वास्तव्यास आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या युुवकाच्या घरावर जमावाने हल्ला केला. पोलिसांनी तेथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीत घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. २६ जुलै रोजी गावात पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. तेव्हापासून परिसरात तणावाची परिस्थिती होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आक्षेपार्ह मजकुरामुळे वादाची ठिणगी पडली. संतप्त जमावाने दुचाकी पेटवून दिल्या. यवत गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

यवतमधील व्यक्तीने समाजमाध्यमात चुकीचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे यासाठी काही लोक असे ‘स्टेटस’ ठेवून अशा घटना घडवित आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. धर्मावर टीका करण्याचे अधिकारही कोणाला नाहीत. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आल्यानंतर यवत गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यास, तसेच कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. – संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस

गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली. शुक्रवारी गावात आठवडे बाजार असतो. तणावामुळे तो बंद ठेवण्यात आला. पोलिसांनी ‘रुट मार्च’ काढून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले.

आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने समाजमाध्यमांवर नजर ठेवली आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles