ठाकरे बंधूंनी मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा- हेमंत पाटील
मराठीसह मराठा बांधवांच्या लढ्यात सहकार्याचे आवाहन
मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला ओबीसी एकजूट परिषदेने पाठिंबा जाहीर केला आहेच, मात्र आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूंनी मराठा समाजाच्या मोर्च्याला पाठिंबा द्यावा,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि ओबीसी एकजूट परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी रविवारी (ता.६) केले.
राज-उद्धव ठाकरे यांनी मराठीसह मराठा समाजाच्या लढ्यात सहकार्य करावे.राजकीय फायदा न बघता त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला मदत केली तर, आंदोलनाला आणखी बळ मिळेल असे पाटील म्हणाले.२९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्च्यात लाखोच्या संख्येने आंदोलक सहभागी होतील. ओबीसी बांधवांचे देखील आंदोलनाला समर्थन आहेच,मात्र राजकीय पक्षांची सामाजिक बांधिलकी म्हणून मनसे-शिवसेनेने (उबाठा) मोर्च्याला पाठिंबा दर्शवावा,असे आवाहन पाटील यांनी केले.
मराठा आरक्षण अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, शिंदे समितीला १ वर्षाची मुदतवाढ, मराठा बांधावांवरील सर्व खटले मागे घेणे, हैद्राबाद गॅझेटस लागू करणे, संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा देणे यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.राज्य सरकारने अद्याप ही या मोर्च्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता सरकार काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती असणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले. आंदोलनात राज आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले तर आनंद होईल,असे पाटील म्हणाले.


