बदलापुरातून महायुतीमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याचे समोर आले. बदलापूरमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना एकाकी पडली असून ते स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. बदलापूरचे आमदार किसन कथोरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला जबरी धक्का दिलाय. स्थानिक पातळीवर महायुतीमधील वादाचा फटका बसण्याचा अंदाज काही जणांकडून वर्तवण्यात येतोय.
नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच बदलापुरात भाजपा आमदार किसन कथोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिलाय. इथं भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती झालीय. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असं चित्र पाहायला मिळतंय. आगामी निवडणुकीत बदलापरकडे ठाण्याच्या नजरा लागल्या आहेत. बदलापूरनर कोण झेंडा फडकवणार? याची चर्चा सुरू आहे.
बदलापुरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे. मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात वाद असल्यामुळे युती होणार की नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू आहे. बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरबाड दौऱ्यावेळी किसन कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट विकासकामांसंदर्भात असली तरी या भेटीतच युतीवर शिक्कामोर्तब झालं का? अशीही एक चर्चा आहे. बदलापुरातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेतं? याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


