महापालिका निवडणूक तोंडावर असताना ठाण्यात शिवसेनेत नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं. शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा देत असल्याचं कारण मिनाक्षी शिंदे यांनी दिलं. मात्र यामागे मोठं राजकारण असल्याची चर्चा आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.भूषण भूईरे या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं होतं. त्यामध्ये विक्रांत वायचळ यांचा समावेश होता. विक्रांत वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात.
पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. ही हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचं चित्र आहे. यावरुनच शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. शिवसेनेतून वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज होत्या अशी माहिती समोर येत आहे. ऐन पालिका निवडणुकीत नाराज मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचं आहे.गेल्या महापालिका निवडणुकीवेळी, म्हणजे 2017 साली शिवसेनेने ठाण्यात 131 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी मिनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्या शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. आता त्यांच्याच राजीनाम्यानंतर ठाण्यातील शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय.
ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी एकीकडे एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भाजपसोबत महायुतीतून लढण्यासाठीही चर्चा सुरू आहे. त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने ठाण्यात शिंदेंसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं चित्र आहे.


