अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी गुजरात राज्यातुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची गुजरात राज्यामध्ये कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, श्रीगोंदा तालुक्यामधुन तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी वय – 17 वर्षे, हिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरीता पळवुन नेले आहे. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं. 247/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहरण झालेली मुलगी मिळुन येत नसल्याने मुलीचे नातेवाईक पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी उपोषणाकरीता बसले होतो. मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेवुन मुलीचा तात्काळ शोध घेणार असलेबाबत नातेवाईकांना आश्वासित केले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अपहरण झालेल्या मुलीचा तात्काळ शोध घेवुन अपहरण करणारे आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले.
सदर आदेशानुसार पोनि श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड़, सोमनाथ झांबरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींची माहिती काढणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
वरील पोलीस पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन तसेच मुलीचे नातेवाईकांकडे विचारपुस केली व तांत्रिक माहिती तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीसह गुजरात राज्यामध्ये पळुन गेलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने सुरत, गुजरात या ठिकाणी जावुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती काढुन निलेश उर्फ सोन्या अशोक सावंत वय 29 वर्षे, रा. चिंभळी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यास व अपहरण झालेली मुलगी वय 17 वर्षे यांना सुरत, गुजरात या ठिकाणावरुन ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपीस व अल्पवयीन मुलगी यांना बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं. 247/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्ह्याचे पुढील तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


