नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार व लगतच्या टाकळी खादगाव तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ परिसरात गेल्या पंधरा दिवसातच लागोपाठ ३१ गाई अज्ञात आजाराने दगावल्या. दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी पशुखाद्यातून प्रथिनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे ‘अल्कलोसिस’ (विषबाधासदृश्य) आजाराने अहिल्यानगर व पारनेर तालुक्यातील 31 संकरित गायी दगावल्याचे पशुवैद्यकीय विभागाच्या प्रयोगशाळेत निष्पन्न झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. उमेश पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार व लगतच्या टाकळी खातगाव तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ परिसरात गेल्या काही दिवसांत लागोपाठ 31 गायी अज्ञात आजाराने दगावल्याने शेतकर्यांची मोठे नुकसान झाले. आमदार काशिनाथ दाते व राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती. जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय विभागाच्या तपासणीत गायी दगावण्याचे कारण निष्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे दगावलेल्या गायींचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, मात्र त्यातही नेमके कारण आढळले नाही.त्यामुळे राज्य पातळीवरून क्रांतीसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ व पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या पथकांनी नमुन्यांची तपासणी केली. त्यामध्ये गायींना कोरडा चारा न देता दूध वाढवण्यासाठी दिल्या जात असलेल्या पशुखाद्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. त्यातून ‘अल्कलोसिस’ (वीषबाधासदृष्य) आजाराने गाईंचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संकरित गाईंसाठी 16 ते 20 टक्क्यांपर्यंत प्रथिने आवश्यक असतात. मात्र या घटनेमध्ये वापरल्या गेलेल्या पशुखाद्यामध्ये 24 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने होती. गायींना कोरडा चाराही दिला जात नव्हता. त्याचा परिणाम होऊन ‘अल्कलोसिस’ झाले व त्यातून गाईंचा मृत्यू झाल्याचे निदान प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये करण्यात आले आहे. दगावलेल्या 31 पैकी 30 गाई संकरित (होस्टन प्रिझन) आहेत.
गाईंना संतुलित आहाराचे आवश्यकता असते. अहिल्यानगर व पारनेर तालुक्यातील गाई दगावल्यांच्या घटनांमध्ये पशुखाद्यातील प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त आढळले व कोरडा चाराही दिला जात नव्हता. त्यातून ‘अल्कोलोसिस’ होऊन झालेल्या आजाराला गाई बळी पडल्या. आता शेतकर्यांना गाईंच्या आहारात कोरडाचाराचा घालण्याचा व मुरघास देतानाही त्याला बुरशी लागलेली नसेल याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
– डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग.


