सातासमुद्रापार घुमला भारतीय संस्कृतीचा नाद: अमेरिकन मॅगेझीनमध्ये नगरच्या अनुराधा ठाकूर यांच्या कुंचल्याची मोहिनी!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):
भारतीय संस्कृतीची मुळे किती घट्ट आणि समृद्ध आहेत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर आला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘साऊल आर्टिस्ट जर्नल’ (Soul Artist Journal) या आंतरराष्ट्रीय मासिकाने आपल्या ताज्या अंकात अहिल्यानगरच्या प्रख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या अजोड कलाकृतींना विशेष स्थान दिले आहे.
आदिवासी जीवनातील ‘रस’ आणि त्यांचा अदम्य उत्साह ठाकूर यांच्या १८ चित्रांच्या माध्यमातून या मासिकाच्या तब्बल २५ पानांवर दिमाखात झळकला आहे.
हे मासिक निसर्गाच्या ऋतूचक्रावर आधारित आहे . नुकताच प्रसिद्ध झालेला हा अंक ‘हिवाळा विशेषांक’ असून त्याची संकल्पना ‘रस’ (The Essence of Life) अशी होती. मासिकाच्या संपादिका डॉ. आर. आर. शक्ती यांनी अनुराधा ठाकूर यांच्याशी संपर्क साधून त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अनुराधा यांनी मांडलेला आदिवासींचा जीवनसंघर्ष आणि त्या संघर्षातही त्यांनी जपलेला आनंद वाचकांना मंत्रमुग्ध करणारा आहे.
अनुराधा ठाकूर यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्रे म्हणजे केवळ रंग रेषा नसून तो एक जिवंत अनुभव आहे.
या विशेष अंकातून जगभरातील रसिकांना त्यांनी अनुभवलेले
रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती रंगलेले पारंपारिक ‘रेला’ नृत्य आणी
त्यामधून समजले की आपण अनेकदा ‘परफेक्ट’ होण्याच्या मागे लागतो, पण खऱ्या आनंदासाठी स्वतःच्या अपूर्णतेचा स्वीकार करणे गरजेचे असते.
ढेकी म्हणजे लाकडी मुसळाने तांदूळ कुटताना गाणी गाणाऱ्या महिला आणि बांबूच्या टोपलीत निवांत झोपलेले बाळ.
निसर्गाने जिथे रंगांची उधळण नाकारली, तिथे कच्छमधील स्त्रिया आपल्या उत्साही ताकदीने (Vibrant Spirit) कापडावर सुई-दोऱ्याने नवनवीन ‘कथा’ विणतात.
झाबुआचा ‘भगोरिया’ सण, जिथे आपण नेहमी ‘सर्वकाही ठीक झाल्यावर’ आनंदी व्हायचे ठरवतो. पण हॆ आदिवासी बांधव शिकवतात की, परिस्थिती कशीही असो, ‘साजरे करणे’ (Celebration) हीच जीवनातील सर्वात मोठी परिपूर्णता आहे. इथे मानवी मनातील अपूर्णता उत्सवाच्या रंगात विरून जाते.
”रस म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतरही मनात रेंगाळणारा तो खोल अनुभव… आणि हेच माझ्या चित्रांचे सार आहे,” अशा शब्दांत ठाकूर यांनी आपल्या कलेचे वर्णन केले आहे.
अहिल्यानगरचा हा जागतिक गौरव आहे.
अनुराधा ठाकूर यांनी ३४ वैयक्तिक आणि २७ समूह प्रदर्शने केली आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे ‘एथनिक सेरेंडिपिटी’ हे चित्र भारताच्या पंतप्रधान कार्यालयाची (PMO) शोभा वाढवत आहे. अमेरिकेसह बाली, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांतील कलाप्रेमींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नगरच्या या चित्रकर्तीने आपल्या कलेच्या माध्यमातून भारतीय आदिवासींच्या आंतरिक समृद्धीला जागतिक ओळख मिळवून दिली आहे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
.
स्वतःची स्वतंत्र स्टाईल
कला विषयाची ची पदवी घेतल्यावर अनुराधा ठाकूर यांनी तब्बल 22 वर्षे समाजातील विविध घटकासाठी कलेच्या माध्यमातून गुणात्मक विकास आणी वर्तनबदल असे काम केले.
मात्र, 2007मध्ये त्यांनी स्वतःची अनुराधा ठाकूर स्टाईल…विकसित केली. आदिवासींच्या जीवनावरील वारली चित्रे प्रसिद्ध आहेत. पण अनुराधा ठाकूर यांनी स्वतःचे वेगळेपण जपताना महाराष्ट्रातील गडचिरोली, गुजराथमधील कच्छ, तरणेतर मध्य प्रदेशातील झाबुआ तसेच राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम, नागालँड या भागातील आदिवासी परिसरात जाऊन तेथील आदिवासी जीवनमान व संस्कृतीचा अभ्यास केला. त्यानंतर प्राधान्याने काळा रंग वापरत आदिवासी व्यक्तिरेखा रेखाटल्या व त्यानंतर काही चित्रांमध्ये सप्तरंगांचा आविष्कार करीत ही चित्रे अधिक उठावदार केली. त्यांच्या या स्वतंत्र शैलीचे जगभरातील चित्रकर्मींमध्ये विशेष अप्रूप आहे व त्याची दादही त्यांना नेहमीच मिळत असते.


