Tuesday, October 28, 2025

शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागणारच नाही, उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही

शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी १२ नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले. कारण निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे असा निकाल दिला होता. त्यानंतर बऱ्याच तारखा पडल्या पण हे प्रकरण प्रलंबित राहिलं. आता शिवसेना कुणाची याबाबत सुनावणी सुरु होते आहे. दरम्यान याबाबत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे.वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया आहे ती वाईट पातळीला पोहचली आहे. न्यायाला उशीर होणं हा अन्यायच आहे. तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे. उद्धव ठाकरेंची बाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जो निर्णय आहे तो न्यायालयाने त्वरित द्यावा असं मला वाटतं.

उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही. कारण त्यांची बाजू मजबूत आहे. जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल लवकरात लवकर न्यायालयात द्यावा अशी माझी मागणी आहे. एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागला तर काय? हा प्रश्नच काल्पनिक आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागणारच नाही. हे माझंच म्हणणं नाही ज्यांना कायदा कळतो, संविधान कळतं ते कुणीही हे सांगतील. एकनाथ शिंदेंचा प्रवास ज्यांना कळला आहे त्यांनाही हे माहीत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी पक्ष चोरला आहे. निष्ठा विकली आहे. त्यांनी संविधानाची मोडतोड करुन अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदही गाजवलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे. कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागू शकतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तरी न्यायालयाने निकाल दिला पाहिजे. खरंतर एकनाथ शिंदेंनी न्यायालयात जाऊन सांगितलं पाहिजे की या प्रकरणाचा निकाल द्या. जर निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला धनुष्य बाण विरहित निवडणुका एकनाथ शिंदेंनी जिंकून दाखवाव्यात असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. असीम सरोदे यांनी या प्रकरणी साम टीव्हीशी संवाद साधला त्यावेळी त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकनाथ शिंदेंनी धनुष्य बाण विरहित आणि शिवसेना हे नाव वगळून लढून दाखवाव्या. जर योग्य निर्णय झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकेल. जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला एकनाथ शिंदे भाजपाच्या गोटात जातील का? असं विचारलं असता असीम सरोदे म्हणाले, एकनाथ शिंदे हे भाजपात दाखल झाले आहेतच. शिवसेनेतील फूट राजकीय कारणासाठी वापरण्यासाठी त्यांचं अस्तित्व कायम ठेवलं आहे. जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात निकाल लागला तर त्वरित एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही लोकांना भाजपात घेतलं जाईल. जे उद्धट, अर्वाच्च बोलणारे आहेत, ज्यांचे राजकीय चेहरे विद्रुप आहेत अशा लोकांना भाजपा त्यांच्या पक्षात घेणार नाही. एक मोठी राजकीय उलाढाल महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसू शकते असंही असीम सरोदे म्हणाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles