मे पासुन अहिल्यानगरमध्ये दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्रपणे कार्यान्वयीत होणार.
अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १५.१२.२०२२ च्या अधिसूचनेनुसार दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र निर्माण करण्यात आला आहे.
दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हा स्तरावरील कामकाज सद्यस्थितीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत हाताळण्यात येत आहे. तथापी जिल्हा व प्रादेशिक स्तरावरील कार्यालये सुरु करण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तसेच प्रादेशिक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ही पदे निर्माण करण्यात आलेली आहेत.
दिव्यांग कल्याण विभागाच्या “१०० दिवसांचा कृती आराखडा” या उपक्रमामध्ये प्रादेशिक स्तरावरील व जिल्हा स्तरावरील कार्यालये सुरु करणे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय कार्यालये स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून “जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी” या पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात दिव्यांग कल्याण विभागाच्या दि.१५ एप्रिल, २०२५ च्या कार्यालयीन आदेशांन्वये सोपविण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हयाकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांचेकडे “जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी” या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तसेच सदर “जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय” दि.१ मे २०२५ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी, अहिल्यानगर येथील दिव्यांग वित्त विकास महामंडळ या कार्यालया मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत आहेत.
सदर कार्यालयामार्फत दिव्यांग शाळा संहिता, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, नियम इ. बाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत सद्यस्थितीत होणारी कामे करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले प्रशासकीय, वित्तीय आणि तदनुषंगिक अधिकार सदर आदेशांन्वये जिल्यातील “जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी” यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.


