खासदार निलेश लंके, खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत ‘आपला मावळा’ची गडसंवर्धन मोहीम भुदरगडवर उत्साहात पार
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष पुरेसा नाही, तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन हीच खरी शिवसेवा आहे,” असा प्रभावी संदेश खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिला.
खासदार नीलेश लंके यांच्या ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा किल्ले भुदरगड (जि. कोल्हापूर) येथे हजारो तरुण-तरुणींच्या सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडला.
या मोहिमेचा शुभारंभ खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार जयंत पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते झाला.
शाहू महाराज म्हणाले, “गडांवरील स्वच्छता, मंदिरे दुरुस्ती, सूचना फलक बसविणे हे छोटे परंतु परिणामकारक उपक्रम आहेत. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मोहिमेमुळे पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, सशक्त आणि अभिमानास्पद गड वारसा म्हणून राहतील.”
त्यांनी पुढे सांगितले की, “‘आपला मावळा’ ही संघटना भविष्यात लाखो मावळ्यांना घेऊन शिवकार्याच्या रणांगणात उतरलेली पाहायला मिळेल, असा मला विश्वास आहे.”
खासदार नीलेश लंके यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला. त्यांनी उपस्थित तरुणांना उद्देशून सांगितले,
“लोकप्रतिनिधी म्हणून भाषणांपेक्षा कृती अधिक प्रभावी असते. शिवनेरीपासून सुरू झालेली ही गडसंवर्धन मोहीम धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड पार करत आता भुदरगडवर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा वारसा जपण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी ‘आपला मावळा’ सातत्याने कार्यरत राहील.”
लंके यांनी सरकारकडून गडसंवर्धनासाठी विशेष निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही दिली.
रविवारी सकाळी ‘आपला मावळा’चे टी-शर्ट घातलेले हजारो युवक-युवती “जय शिवराय!” च्या घोषात गडावर रवाना झाले. कचरा निर्मूलन, झुडपांची छाटणी, वृक्षारोपण, बाके, डस्टबिन, सौरदिवे बसविणे अशा अनेक उपक्रमांमुळे गड परिसर नव्या जोमाने उजळला.
या उपक्रमात आर. के. पवार, सत्यजीत जाधव, राहुल देसाई, प्रतिक पाटील, सुदेश सापळे, संतोष मेंगाने, अनिल घाटगे, सुनिल शिंत्रे, प्रकाश पाटील, रणधीर मोरे, निखिल निंबाळकर, के. के. भारतीय आदींसह ‘आपला मावळा’ प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
साधेपणातून शिकवण
खासदार नीलेश लंके यांच्या साधेपणाने सर्वांचे मन जिंकले. त्यांनी कोणताही दिखावा न करता कार्यकर्त्यांसोबत पुष्पनगर येथील माध्यमिक शाळेत मुक्काम केला आणि पहाटे सर्वांसह “जय शिवराय”च्या घोषात गडावर प्रस्थान केले. त्यांच्या जमिनीशी जोडलेल्या स्वभावाची सर्वत्र चर्चा झाली.
कोल्हापुरात ‘लंके सेल्फी’ची क्रेझ
भुदरगडवर भेट दिल्यानंतर तरुणांनी खासदार लंके यांच्यासोबत सेल्फीसाठी मोठी गर्दी केली.
“लंके साहेबांसोबतचा एक फोटो” हा दिवसाचा ट्रेंड ठरला आणि सोशल मीडियावर #आपला_मावळा #गडसंवर्धनमोहीम या हॅशटॅगने पोस्ट्सची लाट उसळली.


