Friday, November 7, 2025

नगर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी गौरव महोत्सवाची भव्य सुरुवात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी गौरव महोत्सवाची भव्य सुरुवात!

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य शोभायात्रेचा शुभारंभ

नगर(प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जनसेवा फाउंडेशन व विचार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अहिल्यानगर गौरव दिन” महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात करण्यात आला.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेची सुरुवात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, ही शोभायात्रा दिल्लीगेट-बालिकाश्रम रोड येथून प्रारंभ होऊन प्रोफेसर चौक येथे संपन्न झाली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही मिरवणूक एका ऐतिहासिक सोहळ्यात रूपांतरीत झाली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा पथकं, विविध धर्म-जातीतील महापुरुषांच्या मूर्ती, देवदेवतांचे रथ आणि जिल्ह्यातील पारंपरिक नृत्यप्रकारांनी संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता.

हा गौरव महोत्सव तीन दिवस चालणार आहे. दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, तिसऱ्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित एक प्रसिद्ध नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. त्याद्वारे महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

डॉ. विखे पाटील यांनी अभिमानाने नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा महोत्सव अहिल्यानगरमध्ये भव्य स्वरूपात साकारण्यात आला असून, संपूर्ण महाराष्ट्रभर तो साजरा होत आहे, ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे.

या भव्य सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, स्वागताध्यक्षा धनश्री विखे पाटील, विचार भारतीचे अध्यक्ष राजाभाऊ मुळे, भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी मन:पूर्वक आभार मानले. यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून सर्व उपस्थितांना त्रिशताब्दी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles