Saturday, February 21, 2026

दिवंगत अरुणकाका जगताप यांना भावनिक वातावरणात शोकसभा , तनपुरे महाराज म्हणाले, जगावे तर काकांसारखे मरावे तर काकांसारखेच….

*अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहताना सभागृह झाले भावूक*

*भावनिक वातावरणात शोकसभा संपन्न*

अहिल्यानगर – जिल्ह्याचे दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी शोकसभेचे आयोजन येथील अहिल्यानगरच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात करण्यात आले होते. नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शोकसभेस उपस्थिती लावून कै. अरुणकाकांच्या स्मृतींना उजाळा दिला. उपस्थित सर्वचजण भावना व्यक्त करताना भावूक झाले. अरुणकाकांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून पालकत्व गमावले असल्याच्या भावना यावेळी उपस्थित बहुतांशांनी व्यक्त केल्या. यावेळी एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आलेली अरुणकाकांच्या जीवनावरील ध्वनी चित्रफित पाहून अनेकांना गहिवरून आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व आ.संग्राम जगताप यांची उपस्थितांनी भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या.

यावेळी हभप आदिनाथशास्त्री महाराज, हभप बद्रीनाथ तनपुरे महाराज, मंदारबुवा रामदासी, रमाकांत व्यास महाराज, हभप पुंडलिकशास्त्री जंगले महाराज, हभप उद्धव मंडलिक महाराज, जैन मुनी आलोकऋषीजी महाराज, हभप रामदास क्षीरसागर महाराज, पास्टर दीपक पाडळे, महानुभाव पंथाचे शाम बिडकर महाराज आदी आध्यात्मिक क्षेत्रातील धर्मगुरूंच्या उपस्थितीत (कै.)अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व क्षेत्रांमधील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बद्रीनाथ तनपुरे महाराज म्हणाले, जगावे तर काकांसारखे मरावे तर काकांसारखेच असे आदर्श जीवन अरुणकाका जगले. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या प्रत्येकासाठी आधार देत. असा अलौकिक आपलेपणा काकांमध्ये होता. त्यांचा वारसा सचिन जगताप व संग्राम जगताप पुढे नेतील.

पुंडलिकशास्त्री जंगले महाराज म्हणाले, वारकरी संप्रदाय जपत कायम दिद्यांना सहकार्य करण्याचा वारसा अरुणकाकांनी पुढे चालवला. आता त्यांच्यानंतर दोन्ही मुलेही हा वारसा पुढे नेतील.

मंदारबुवा रामदासी म्हणाले, अरुणकाकांनी आपले पूर्ण जीवन लोकहितासाठी वेचले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी आ.संग्राम जगताप व सचिन जगताप यांना सर्वांनी सहकार्य करावे.

अलोकऋषीजी म्हणाले, अरुणकाकांनी समज जोडण्याचे मोठे काम करून आदर्श निर्माण केला. त्यांच्या या चांगल्या कामच अनुकरण सर्वांनी करावे. संग्राम जगताप व सचिन जगताप त्यांच्या पायावर पाऊल टाकून समाजकार्य करत आहेत.

पास्टर दीपक पाडळे म्हणाले, अरुणकाकांनी शहरातील ख्रिस्ती समाजचे अनेक प्रश्न मार्गी लावले. दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देत त्यांनी मोठे सहकार्य समाजाला केले होते.

आ.मोनिका राजळे म्हणाल्या, २०१२ साली मी जिल्हा परिषदेची सदस्य झाले तेव्हापासून काकांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. तसेच मतदारसंघासाठी मोठा निधीही त्यांनी उपलब्ध करून दिला.

रा.स्व.संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव म्हणाले, अरुणकाका बालपणी वाडियापार्क येथील संघाच्या शाखेत नित्याने येत असे. त्यामुळे त्यांना बालपणापासूनच राष्ट्रसेवेचे व लोकसेवेचे बाळकडू मिळाल्याने आयुष्यभर समर्पित जीवन जगत गोसेवाही केली.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, सध्याचे राजकारणात द्वेष वाढत आहेत. पण अरुणकाकांनी कधीही द्वेषाने राजकारण केले नाही. तर विरोधकांनाही आपलेसे करून घेतले. त्यांच्या स्मरणार्थ येत्या वर्षात ६६ हजार झाडे लाऊन संगोपन करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन केले.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले, अरुणकाकांनी सर्व क्षेत्राला राजश्रय देत मोठे सहकार्य केले. आज त्यांच्या निधनाने हे सर्व क्षेत्रे पोरके झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दादा कळमकर म्हणाले, मी व अरुणकाका अनेक निवडणुका विरोधात लढलो पण कधीही आमच्यात कटुता आली नाही. त्यांना विधान परिषदेचे आमदार होण्यासाठी मी मदत केली तर अभिषेकला महापौर होण्यासाठी काकांनी मला मदत केली होती. त्यांच्यावर जनतेचे केव्हढे प्रेम होते ते विराट अंत्ययात्रेने सर्वाना दिसले आहे.

आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रास्ताविकात काही सूचना करून काकांनी सर्वांवर प्रेम केले व सर्वांनीच काकांवर प्रेम केले आहे. या प्रेमापोटीच आज येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला आहे, असे सांगितले.

माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले अरुणकाकांचे कार्य एका शोक सभेमध्ये व्यक्त होणे अशक्यच आहे. प्रत्येकाला भावना व्यक्त करायच्या आहेत. यासाठी लवकरच काकांच्या जीवनावर एक परिपूर्ण पुस्तक करण्याच्या कामास सुरुवात करणार आहोत. काकांच्या वर्षश्राद्धा पर्यंत हे पुस्तक आपण सर्व मिळून तयार करू, असे सांगून उपस्थित सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

यावेळी माजी आमदार बबनराव पाचपुते, डॉ.बापूसाहेब कांडेकर, आरपीआयचे सुनील साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, प्रताप ढाकणे, विनायक देशमुख, भाजपाचे महेंद्र गंधे, माजी आमदार विठ्ठलराव अभंग, चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, माधवराव कानवडे, संभाजी कदम, सुमित गायकवाड आदींनी थोडक्यात भावना व्यक्त करून अरुणकाकांना श्रद्धांजली वाहिली. सामुहिक पसायदानाने शोकसभेची सांगता झाली. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles