अहिल्यानगर : गुंतवणूकदारांच्या रकमेचा ‘सिस्पे इन्फिनाईट बिकन’ कंपनीने केलेल्या घोटाळ्याच्या गुन्ह्यातील दोन प्रमुख आरोपी दुबईमध्ये फरार झाले आहेत. त्यांना अहिल्यानगरमध्ये परत आणण्यासाठी ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावण्यासाठी सीबीआयकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
जिल्ह्यातील गुन्हेगारीविषयक वार्षिक आढावा सादर करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यावेळी उपस्थित होते.
सिस्पे घोटाळा सध्या जिल्ह्यात गाजत आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनीही तसे आश्वासन दिले आहे. आर्थिक घोटाळ्याच्या तपासाबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील माहिती दिली.
सिस्पे घोटाळ्याचे जिल्ह्यात एकूण ४ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यामध्ये १४ कोटी ४७ लाख ९८ हजार ८४९ रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक पातळीवर निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे. शाखेने गुंतवणूकदारांना तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. ही रक्कम सुमारे ४५० ते ५०० कोटी रुपये असावी, असा अंदाज घार्गे यांनी व्यक्त केला.
सध्या या गुन्ह्यात कंपनीच्या दोन संचालकांसह १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गुंतवणूकदारांमध्ये राज्य सरकारचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक, पोलीस यांचाही समावेश आहे. दोन प्रमुख आरोपी फरार होऊन दुबईत स्थायिक झाले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी न्यायालयाकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. आता त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी सीबीआयकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तो लवकरच मार्गी लागेल असेही पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. अनेक कंपन्या छोट्या छोट्या गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक करतात. अशा स्वरूपाच्या जाहिरातींवर पोलिसांचे लक्ष आहे. अशा स्वरूपात पोलिसांनी स्वतःहून श्रीरामपूरमध्ये कारवाई करत एका कंपनीची मालमत्ता सील केली आहे. अशी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिली.


