Friday, March 20, 2026

केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघड, मयताची ओळख पटली 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघड, मयताची ओळख पटली
3 आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि. 22/06/2025 रोजी केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळया जागेत अनोळखी पुरूष जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेला असून त्याचे अंगावर जखमा व मारहाणीचे वळ होते.जखमीस वैदयकीय औषधोपचारकामी सिव्हील हॉस्पीटल, अहिल्यानगर येथे पाठविले असता वैदयकीय अधिकारी जखमीस मयत घोषीत केल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे 88/2025 प्रमाणे अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला.अकस्मात मृत्यूचे तपासात वैदयकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कठीण व टणक हत्याराने जबर मारहाण करून जीवे ठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणुन पुरावे नष्ट केले.याबाबत कोतवाली पोलीस ठाणे गुरनं 583/2025 बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नमूद घडलेल्या गंभीर गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच मा.पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी घटनाठिकाणास भेट देऊन, स्थानिक गुन्हे शाखेस अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार शाहीद शेख, संदीप पवार, फुरकान शेख, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व भगवान धुळे अशांचे पथक नेमुण गुन्हयाच्या तपासाबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

तपास पथकाने गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देऊन, घटनाठिकाणचे जवळील व केडगाव ते कायनेटीक चौक, अहिल्यानगर मार्गावरील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे 1) संदेश संजय क्षेत्रे 2) अमन असीरमिया शेख व 3) मंगेश कालीदत्त कांबळे, सर्व रा.केडगाव, अहिल्यानगर असे आरोपी गुन्हयाचे तपासात निष्पन्न केले.दि.24/06/2025 रोजी गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे केडगाव, अहिल्यानगर परिसरात आरोपीचा शोध घेऊन 1) संदेश, संजय क्षेत्रे, वय 25, रा.भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर 2) अमन असिरमियॉ शेख, वय 23, रा.शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर व 3) मंगेश कालीदत्त कांबळे, वय 21, रा.भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपी मंगेश कालीदत्त कांबळे याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे मयताचे आधारकार्ड मिळून आले. आधारकार्डवरून मयत हा बोबडा अनारसिंग, रा.सुखपुरी, जैनाबाद, बुरहानपूर, मध्यप्रदेश असल्याचे निष्पन्न झाले.

ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता दि.22/06/2025 रोजी रात्री 02.00 वा.सुमारास आरोपी हे मोपेड गाडीवरून पुणे बस स्टॅण्ड, अहिल्यानगर येथून केडगावकडे जात असताना रस्त्यावर थांबलेल्या अनोळखी इसमास लुटमार करण्याच्या उद्देशाने त्यास मोपेड गाडीवर जबरीने बसवून त्यास केडगाव इंडस्ट्रियल परिसरात नेऊन त्यास मारहाण केली.अनोळखी व्यक्तीकडील बॅग, खिशामधील पैसे व एटीएम कार्ड काढुन घेऊन, मयतास एटीएम पीनची विचारणा करून आरोपी संदेश संजय क्षेत्रे हा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएमचा पीनकोड चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत. मयतास लुटण्याच्या उद्देशाने आरोपीतांनी मयतास लाकडी काठी व दगडाने जबर मारहाण करून त्यास जीवे ठार मारले.

ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles