Friday, February 20, 2026

मंत्री छगन भुजबळ म्हणाले…ओबीसी’मध्ये चुकीचे लोक घुसणार नाही, हे जनतेनेच पहावे

राहाता : एकतर मागासवर्गीय जनतेला काही गोष्टी मिळत नाही. मिळालेल्या गोष्टी आमच्या हातातून निसटल्या होत्या. आम्ही सर्वोच्च न्यायालयात उभे राहिलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आम्ही आहे तेवढे तरी आमचं आरक्षण द्या, अशी मागणी केली. न्यायालयाने आमची मागणी ऐकली आणि पूर्ण केली. मागासवर्गीयांच्या आरक्षणात कोणी चुकीचा मनुष्य घुसणार नाही, हे जनतेने बघायचे आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केले.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण दिले. या निर्णयावर समाधान व्यक्त करत भुजबळ म्हणाले, की २७ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. मात्र, या आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र, या आरक्षणात चुकीचा मनुष्य घुसणार नाही, ते जनतेनं ठरवलं पाहिजे.

एका प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, की नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून वादविवाद वाढवण्याचे काही कारण नाही. शेवटी पालकमंत्री होऊन जनतेची जी कामे करायची असतात ती काम मी आता सुद्धा करू शकतो. नाशिक पालकमंत्रिपदाच्या वादात मला अजिबात पडायचे नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत सगळे काही बघून घेतील, असेही त्यांनी सांगितले.

मी कायम जनतेत असतो, अनेक कामे आम्ही आमच्या मनाने करत असतो, जनतेच्या सूचनांचे पालन देखील करावे लागते, मंत्री झाले म्हणजे सगळी अक्कल असते, असे नाही. मंत्री सामान्य माणूसच असतो. रेशन दुकानात सुरू असलेल्या काळाबाजार बाबत मंत्री भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, की राज्यात ५४ हजार रेशनिंगची दुकाने आहेत. करोना काळात देखील कर्मचाऱ्यांनी जनतेला रेशन पोहचविण्याच काम केले. काही छोट्या छोट्या दुकानांत काळाबाजार होत असेल. मात्र, तुम्ही लोकांनी आणि प्रत्येक गावातील स्थानिक नेत्यांनी याबाबत आम्हाला माहिती देणं गरजेचे आहे. मी कार्यकर्त्यांना बळ देणार, कार्यकर्ते आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. साईबाबांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात तेच केले. आपण जनतेचे सगळे अश्रू पुसू शकत नाही पण एक जरी अश्रू पुसलं तरी खूप झाले.

मी पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, ही मागणी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत करायला हवी, हा मी आग्रह धरला आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मंत्रिपद असो किंवा नसो, लहानपणापासूनच मी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतो. काही धार्मिकस्थळे अशी असतात की, तिथे गेल्यावर आपोआपच नतमस्तक व्हावेसे वाटते. साईबाबा हे असेच एक स्थान आहे. त्यामुळेच आज मी त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलोय. नवीन जबाबदारी पार पाडताना यश मिळावे आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी साईचरणी प्रार्थना केली, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles