Friday, February 20, 2026

अहिल्यानगर महापालिकेत तुतारीचा आवाज घुमणार -खासदार निलेश लंके

शक्ती आणि पैशाच्या जोरावर सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न -खासदार निलेश लंके
कोट्याधीशांचे नव्हे, सर्वसामान्यांचे नेतृत्व महापालिकेत हवे; तुतारीचा आवाज घुमणार, महापालिकेत मशाल व पंजाही फुलणार
प्रभाग क्रमांक 2 मधील महाविकास आघाडीची प्रचार रॅली
अहिल्यानगर- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी निर्णायक लढाई बनली असून, शक्ती आणि पैशाच्या जोरावर सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सर्वसामान्य वर्गाचे प्रश्‍न समजून घेणारे आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारे प्रतिनिधी महापालिकेत गेले, तर चुकीची करवाढ थांबेल आणि नागरी प्रश्‍न मार्गी लागतील, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मधील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पाईपलाईन रोड, एकवीरा चौक परिसरातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत खासदार निलेश लंके सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.

या प्रभागात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रतीक्षा गौतम शिंदे (अ), अमोल बाबासाहेब खाडे (ब), झिने सुनिता कैलास (क) तसेच डॉ. दरंदले दिपक पांडूरंग यांच्या प्रचारार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि जोशपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
खासदार निलेश लंके पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने जनतेच्या प्रश्‍नांची जाण असणारे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी बांधिलकी ठेवणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. हे उमेदवार केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर जनतेचे खरे सेवक म्हणून काम करतील. त्यामुळे सर्वसामान्यांनी आपल्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या योग्य प्रतिनिधींची निवड करण्याची हीच योग्य वेळ आहे. शहरात येत्या काळात तुतारीचा आवाज घुमणार असून, महापालिकेत मशालही फुलणार आणि हाताच्या पंजासह परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, सरपंच शरद पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उमेदवारांनी व नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधत, येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles