आदर्श गाव मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून चालू असलेल्या रस्त्याच्या वादाचा प्रश्न संवादातून निकाल
महसूल सप्ताहाचे लोकोपयोगी फलित, तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वहिवाटी रस्त्याबाबतचा वाद अखेर महसूल विभागाच्या हस्तक्षेपाने संवादाच्या माध्यमातून निकाली निघाला आहे. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने तहसीलदार संजय शिंदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रस्त्याचे मोजमाप करून हद्द निश्चित केली आणि प्रत्यक्ष रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. या निर्णयामुळे सुमारे 250 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होणार असून अनेक विद्यार्थी जे ३ किलोमीटरचा फेरा मारून शाळेत जात होते, त्यांनाही आता सहज आणि जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. गावातील सलोखा, समंजसपणा आणि महसूल प्रशासनाच्या सक्रिय सहभागातून झालेल्या या निर्णयाचे गावकऱ्यानी कौतुक केले. तहसीलदार संजय शिंदे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना म्हटले की, मांजरसुंबा गावाने आदर्श कार्यपद्धतीचा आदर्श ठेवत इतर गावांसमोर एक सकारात्मक उदाहरण उभे केले आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतावर जाण्यासाठी रस्ता मिळणे हा मूलभूत हक्क आहे. प्रशासन केवळ माध्यम ठरते; पण संवाद, एकत्रित विचार व समंजसपणा यातूनच शाश्वत निकाल साधता येतो. या निर्णयप्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारे व शेतकऱ्यांच्या संवादासाठी मार्गदर्शन करणारे माजी सरपंच जालिंदर कदम, नायब तहसीलदार अभिजीत वांडेकर, मंडळ अधिकारी रामकिसन नलवडे, ग्राम महसूल अधिकारी अनिता जाधव, राजू वाघमारे, लहानू कदम, किरण कदम, चंद्रभान कदम, एकनाथ कदम, विजय वाघमारे, शिवाजी आढाव, रामदास पठारे, भीमराज कदम, सागर वाघमारे, प्रकाश कदम, गोरख श्रीधर आदीसह उपस्थित होते.
माजी सरपंच जालिंदर कदम यांनी या वेळी सांगितले की, गावातील प्रश्न गावातच मिटवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. वाद न्यायालयात नेल्यास वर्षानुवर्षे खर्च, दिरंगाई आणि मनस्ताप होतो. संवाद साधल्यास सलोखा वाढतो व गावाची उन्नती शक्य होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा वाद आमदार शिवाजीराव कर्डिले, तहसीलदार संजय शिंदे, व अक्षय कर्डिले यांच्या पुढाकारातून सुटला याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या माध्यमातून गावातील सुमारे २५० शेतकरी, शाळकरी मुले, महिला व वयोवृद्ध नागरिकांचा रोजचा प्रवास अधिक सुलभ झाला असून गावचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे. असे ते म्हणाले.
प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्यासाठी रस्ता असावा हे शासनाचे धोरण असून महसूल सप्ताह निमित्त मांजरसुंबा गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत, संवादातून मार्ग काढला नगर तालुक्यामध्ये 121 गावे असून प्रत्येक ४ ते १० रस्त्याच्या प्रश्नांचा वाद सुरू आहे. त्यांनी देखील एकत्रित येऊन मिटविण्याचे काम करावे व प्रशासनाला मदत करावी. आदर्श गाव हिवरे बाजार प्रमाणे मांजरसुंबा गावाने देखील आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यामध्ये नावलौपिक निर्माण केला असल्याचे मत तहसीलदार संजय शिंदे यांनी केले.


