हुरी : वरपक्षाने लाखो रुपये खर्च करून शुभविवाहाची सर्व तयारी पूर्ण केली, मात्र लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीसह तिचे नातेवाईक अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना पुन्हा घडल्यामुळे राहुरीत संतापाची लाट उसळली आहे. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे ही घटना घडली राहुल त्रिंबक गागरे या 30 वर्षिय तरुणाचा विवाह राहुरी शहरातील एका तरुणीसोबत ठरला होता. राहुल गागरे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. विवाह ठरविण्यासाठी नातेवाईकांच्या मदतीने त्याची राहुरीतील एका मुलीशी ओळख करून देण्यात आली. दोन्ही कुटुंबियांकडून पाहणी झाल्यानंतर लग्न ठरले. नवरीच्या वडिलांनी वेळोवेळी वरपक्षाकडून दीड लाख रुपये रोकड, 20 हजाराचा मोबाईल, नातेवाईकांसाठी कपडे व भेटवस्तू घेतल्या.
विवाह सोहळा 26 ऑक्टोबर रोजी राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिराजवळ पार पडणार होता, मात्र टाळी वाजण्याआधीच नवरीचे घर रिकामे झाले. वरपक्षाने फोन, संदेश, संपर्क करणे हे सगळे प्रयत्न केले, परंतू ते सर्व व्यर्थ ठरले.तरुणांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कारण ही केवळ फसवणूकच नव्हे, तर तरुणांच्या आयुष्याशी खेळ आहे. विवाहपूर्व ओळख व व्यवहारासाठी काही कायद्याची ठोस चौकट तयार करण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. मुलीचा विवाह करण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर करडी नजर ठेवणे गरजेचे आहे.
‘माझी आर्थिकचं नव्हे, तर मानसिक मोठी फसवणूक फसवणूक झाली आहे. नवरीचे नातेवाईक मला धमक्या देत आहेत. दोन दिवसांपासून मी पोलिस ठाण्यात फिरतो, पण गुन्हा दाखल होत नाही. माझ्याकडे सर्व पुरावे असुनही पोलिस उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. माझ्या जिविताला धोका आहे.
राहुल गागरे,म्हैसगाव, ता. राहुरी
गेल्या काही वर्षांत मुलीच्या विवाहाच्या नावाखाली युवकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. वर पाहणी किंवा लग्न जुळवणी प्रक्रियेत नकली ओळखी, आर्थिक व्यवहार व दिखाऊपणामुळे निरपराध तरुण मोठ्या संकटात सापडत आहेत. अनेकतरुण नोकरी किंवा शेतात कष्ट करून रक्कम साठवतात. एकदाचे लग्न ठरले, या आनंदात ते सर्व पैसा खर्च करतात, पण काही स्वार्थी लोक त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेत असल्याचे वास्तव समोर येत आहे.


