राज्यात नवीन तालुके आणि जिल्हे होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा पेव फुटले आहे. राज्यात तब्बल ८१ तालुके आणि २० नवे जिल्हे बनवले जाणार असल्याचा प्रस्ताव सरकारकडे आलाय. नवीन जिल्हे कधी होणार सरकार कधी घोषणा करणार याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चंद्रपुरात माहिती दिली. दरम्यान मंत्री बावनकुळे यांच्या विधानानंतर नागरिकांमध्ये कोणते नवे जिल्हे होणार, याबाबत चर्चा सुरू झालीय.
दरम्यान सरकार समोर प्रस्ताव आहे, त्यावर निर्णयही घेतला जाणार आहे, पण जनगणनेचा अहवाल आला तर नवीन जिल्ह्यांबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरणही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. सरकारसमोर नवीन २० जिल्हे आणि ८१ तालुके करण्याचा प्रस्ताव आलाय. परंतु मात्र जोपर्यंत २०२१ ची जनगणना होत नाही आणि त्याचा तपशील येत नाही, तोपर्यंत त्यावर निर्णय होणार नसल्याचं बानवकुळे म्हणालेत.
दरम्यान नवीन जिल्हे होण्याची चर्चा दोन वर्षांपासून चालू आहे, परंतु मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यावेळी विधानसभेत या चर्चांना पू्र्ण विराम दिला होता. २०२३ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील, हे महसूल मंत्री होते, विधानसभेत बोलताना त्यांनी नवीन जिल्हे होण्याच्या चर्चांना ब्रेक लावला होता. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी येणारा मोठा आर्थिक खर्च होतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान ३५० कोटी रुपये खर्च येत असतो. तसेच जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जागेवरून होणारे वादामुळे २०२३ मध्ये नवीन जिल्हे होण्याची चर्चा संपृष्टात आली होती.
पण नवीन तालुके निर्माण करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक होतं. आता हाती आलेल्या माहितीनुसार सरकारसमोर नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव आलाय. त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे आहेत, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनात सुलभता येत स्थानिक विकासाला गती मिळत असते. पण या प्रक्रियेसाठी आर्थिक भार आणि प्रशासकीय अडचणी येत असतात
. दरम्यान नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती संदर्भात सरकारसमोर प्रस्ताव आहे. पण जोपर्यंत 2021 ची जनगणना होत नाही आणि त्याचा तपशील येत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. तो अहवाल आल्यानंतरच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा निर्मितीबाबतचा निर्णय घ्यावा लागतो. जानेवारी महिन्याच्या आधी सोशल मीडियावर नवीन जिल्ह्यांबाबत काही मेसेज व्हायरल होते. २६ जानेवारी २०२५ ला नवीन जिल्ह्यांची घोषणा केली जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत होता. परंतु ते मेसेज खोटे असल्याचं नंतर निदर्शनात आले होते.


