Friday, February 20, 2026

उद्योजकांना त्रास देणार्‍यांना ठोकून काढणार ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

अहिल्यानगर : औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही-गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होताना येथे काहीजण उद्योजकांना त्रास देण्याचे ‌‘उद्योग‌’ करत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. उद्योजकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढू, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. लगेच त्यांनी ठोकून काढू म्हणजे कायद्याने ठोकून काढू, अशीही पुष्टी जोडली.

अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील सुपा (ता. पारनेर) औद्योगिक क्षेत्रातील खासगी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार काशिनाथ दाते, आ. बबनराव पाचपुते, ह.भ.प. नामदेवशास्त्री, ह.भ.प. महंत शिवाजी महाराज उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, नागरिकांना उद्योगांकडून त्रास होत असेल तर अधिकृत यंत्रणेकडे दाद मागा. मात्र, त्यांना दिलेला त्रास खपवून घेतला जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्रात नवे उद्योग येत असताना येथे काही वाईट ‌‘उद्योग‌’ तयार झाले आहेत. काहीजण उद्योजकांना त्रास देत असल्याची माहिती मिळाली आहे. ‌‘इज ऑफ डूइंग बिजनेस‌’, उत्पादन खर्च कमी व कायदा-सुव्यवस्था या आधारावर महाराष्ट्रात उद्योग वाढ होत आहे. मात्र, अशा परिस्थितीत औद्योगिक क्षेत्रातील एखादी छोटी घटनाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गांभीर्याने घेतली जाईल. जिल्हा पोलिस अधीक्षकांना मी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.महाराष्ट्रात उद्योग वाढताना पर्यावरणही जपायचे आहे. त्यामुळे उद्योग हे पर्यावरणपूरकच असायला हवेत. उद्योगवाढ व पर्यावरण एकत्र साधायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी उद्योग वाढ केवळ मुंबई-पुणे क्षेत्रातच होत होती. आता उद्योग वाढीचेही विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी ‌‘मेक इन इंडिया‌’ महत्त्वाचे आहे. त्या माध्यमातून आयातीला पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles