शिर्डी-पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता वाढलेली असतानाच, आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर शिर्डीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे साईबाबा संस्थानला ही धमकी पाठवली. या प्रकारामुळे साई संस्थान आणि स्थानिक पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु आहे. पोलिस विभागाकडून ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू असून, ही धमकी केवळ खोडसाळपणातून देण्यात आली आहे की त्यामागे कुठली तरी गंभीर योजना आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थानने या घटनेबाबत तपशील देण्यास नकार दिला आहे. तरीही, या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी कडक करण्यात येत असून, सीसीटीव्ही आणि कुतूहलजनक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून धमकीच्या पार्श्वभूमीवर साईमंदिराची बीडीएस आणि डॉग स्कॉडसह पथकाने कसून तपासणी केली आहे. साईमंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर भक्तांचीही कसून तपासणी केली जात असून धमकीचा मेल पाठवणाऱ्या अजित जाकोमोला नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबा मंदिराचे हजारो सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथक भक्तांची काळजी घेण्यास सक्षम असून देशभरातील साईभक्तांनी निश्चिंतपणे साईदर्शनाला यावं, असं आवाहन साईमंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील शिर्डीच्या साई संस्थानला धमकीचे मेल आल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु यापूर्वीचे पत्र आणि मेल फेक असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल आल्याने खोडसाळपणातून कोणी हे कृत्य केले आहे का, या अनुषंगानेही पोलिसांकडून तपास केला जात आहे.


