अहिल्यानगर -बोल्हेगाव येथे शुक्रवारी (8 ऑगस्ट) रात्री तिघा भावांवर लोखंडी रॉड, लाकडी दांडे व दगडांनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी ओंकार कांबळे, त्याचा दाजी गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही), सुदर्शन पवार उर्फ लाल्या, सुयेश जाधव, सागर व पंकज (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) व दोन अनोळखी इसम यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साजिद लतीफ शेख (वय 27, रा. आदेश लॉन पाठीमागे, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रात्री साडेआठच्या सुमारास दोस्ती हॉटेलमध्ये मित्रासोबत बसल्यावर ओंकार कांबळे व त्याचे साथीदारांनी किरकोळ कारणावरून वाद घालून शिवीगाळ केली. तेव्हा उपस्थित नागरिकांनी वाद मिटवला. परंतु त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास ओंकार कांबळे, त्याचा दाजी गायकवाड, सुदर्शन पवार, सुयेश जाधव, सागर, पंकज व इतर दोन जण चार दुचाकीवरून फिर्यादीच्या घरी आले.
त्यावेळी ओंकार कांबळे याने लोखंडी रॉडने फिर्यादी साजिद शेख यांच्या डोक्यावर मारहाण केली, तर सुदर्शन पवारने लाकडी दांडक्याने हात व छातीवर वार केले. इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. आवाज ऐकून फिर्यादीचे भाऊ सद्दाम शेख व शहाबाज शेख बाहेर आले असता, त्यांच्यावरही लोखंडी रॉड, दांडे व दगडांनी हल्ला करण्यात आला. संशयित आरोपींनी हे माजलेत, मारून टाका अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केलेले आहे.
घटनेनंतर संशयित आरोपींनी एमएच 16 डीआर 6949 व एमएच 16 व्ही 7180 या क्रमांकाच्या दोन दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत.