Tuesday, November 4, 2025

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा लेखाधिकार्यासह तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-१ अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे रत्नागिरीच्या शासकीय कर्मचा-यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी २४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील १६ हजार ५०० रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी उशिरा एकाच वेळी तीघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यातील ५५ वर्षीय तक्रारदार दापोली पंचायत समितीत सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयाचे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरीमार्फत करण्यात आले होते. या अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपालन अहवाल सादर केला होता.

हा अहवाल अंतिम करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांची भेट घेतली. त्यावेळी, २१ मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी जाधव यांच्या वतीने घवाळी याने तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीविरोधात तक्रारदाराने ११ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी या मागणीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती १६ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी, सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्या संमतीने कंत्राटी शिपाई सतेज घवाळी याने तक्रारदाराकडून १६ हजार ५०० रुपयांची लाच घेवून ती रक्कम तात्काळ जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केली. याचवेळी लाच लुचपत विभागाच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले. रात्री उशिरा पर्यत तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मात्र या कारवाईने रत्नागिरीतील शासकीय यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles