अहिल्यानगर – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नगर मधील तिघांची ७० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा येथील आरोपीवर नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत इम्रान बशीर शेख (वय ४९, रा. जीपीओ रोड, हाजी इब्राहीम कॉलनी) यांनी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणुकीची ही घटना २४ जून २०२४ ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली आहे. फिर्यादी इम्रान शेख यांची समीर शब्बीर सय्यद (रा. मुंजोबा चौक, श्रीगोंदा) याच्याशी ओळख होती. एक दिवस समीर सय्यद याने फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्यास सध्या जास्त नफा मिळत असल्याचे सांगितले. त्यांना विविध उदाहरणे देत त्यांचा विश्वास संपादन केला.
त्याच्यावर विश्वास ठेवून ज्यादा पैसे मिळण्याच्या आशेने फिर्यादी शेख तसेच त्यांचे बंधू व एक मित्र असे तिघांनी सहा महिन्यांच्या कालावधीत समीर सय्यद याच्याकडे सुमारे ७० लाख रुपये रोख स्वरुपात दिले. या तिघांचा विश्वास बसावा म्हणून सय्यद याने त्यांना बँकेचे कोरे चेक दिले. नंतर काही दिवसांनी फिर्यादी यांनी आरोपीकडे गुंतवणुकीतील परताव्याबाबत चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अनेक दिवस पाठपुरावा केल्या नंतरही परतावा ही मिळाला नाही आणि गुंतवणूक केलेली रक्कम ही मिळाली नाही.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीने दिलेले चेक बँकेत भरले असता ते न वटता परत आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर अखेर इम्रान शेख यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी समीर सय्यद याच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१४, ३१६ (२)(५), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला स.पो.नि. योगिता थोरात या करीत आहेत.


