अहिल्यानगर -जिल्ह्यात तीन हजार कोटींचा सिस्पे इन्फिनिटी घोटाळा होऊन यातील आरोपी मोकाट आहेत. या गुन्हेगारांना खा. नीलेश लंके मदत करत असून, त्यांना पाठिशी घालत आहे. आरोपी थेट संसदेत जाऊन लंके यांना भेटले आहे. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. याबाबतचे सर्व पुरावे आर्थिक गुन्हे शाखेला देऊनही त्यावर कारवाई केली जात नाही. पोलीस यंत्रणेची भूमिका संशस्यास्पद असून, येत्या १५ दिवसांत कारवाई न झाल्यास गुंतवणूकदारासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान. खासदार लंके यांना आरोपी करण्याची मागणी त्यांनी केली.
गुंतवणूकदारांना ज्यादा आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून सिस्पे व इन्फिनिटीमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. दीड लाख गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवले होते. दर महिन्याला आकर्षक परतावा दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, पैसे न देता गुंतवणूक दारांची फसवणूक झाली. गुंतवणूकदारांचे जवळपास तीन हजार कोटी रुपये अडकले आहेत. वाढत्या तक्रारी पाहता श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ७ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी फरार आहे.
मुख्य आरोपी विनोद गाडीलकर हा संसद भवनात खा.लंके यांना जाऊन भेटला आहे. याबाबतचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. लोकांचे पैसे देत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. वेळ पडली तर दुबईला जाणार असल्याचे आरोपी गाडीलकर याने गुंतवणूकदारासोबत व्हॉटसअपवर चर्चा करताना सांगितले आहे. आरोपी विनोद गाडीलकर संसद भवन पसिरामध्ये अखेरीस दिसला. त्यानंतर तो फरार झाला आहे. त्यामुळे गाडीलकर याला खा. लंके यांनीच फरार केले आहे, असा आरोप ठोकळ यांनी केला आहे.येत्या १५ दिवसांत कारवाई न झाल्यास गुंतवणूकदारांसोबत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मनोज ठोकळ यांनी दिला आहे. यावेळी बबन घुले, राहुल बन्सी सोनवणे उपस्थित होते.
पैसे गोळा करणार्यांवर कारवाई करू नका ते बेरोजगार आहेत. याबाबतच पत्र खा. नीलेख लंके यांनी दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे पदाचा गैरवापर करत खासदार लंके कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेला याबाबत विचारले असता त्यांनी कारवाई करा, असे पत्र दिले असे सांगितले. मग लंके यांनी दिलेले पत्र बदलले गेले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. खा.लंके यांचा पोलीस यंत्रणेवरचा दबाव स्पष्ट होत आहे. लंके यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने कारवाई केली पाहिजे. तसेच आरोपींना लंके यांनीच पळवून लावण्याचा आरोप करण्यात आला आहे.


