महाराष्ट्राला आणखी एक एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. शिर्डी ते तिरूपती ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. चार राज्यातून ही ट्रेन धावणार आहे अन् ३१ स्थानकात थांबणार आहे. शिर्डी ते तिरूपती हा ३१ तासांचा प्रवास असेल. केंद्रीय मंत्री व्ही.सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. शिर्डी-तिरूपती या एक्सप्रेस ट्रेनचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील लोकांना होणार आहे. ही एक्सप्रेस राज्यात ११ स्थानकात थांबणार आहे, त्यामधील बहुतांश स्थानके ही मराठवाड्यातीलच आहे. त्यामुळे मराठवाड्यात प्रवास कऱण्यासाठी नवीन ट्रेन मिळणार आहे. त्याशिवाय शिर्डी अन् तिरूपती ही दोन देवस्थानेही या ट्रेनमुळे जोडली जाणार आहेत.
नव्या एक्सप्रेस ट्रेनमुळे तिरुपती आणि शिर्डी ही तीर्थक्षेत्र जोडली गेली आहेत. या मार्गावर नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड यासह इतर महत्त्वाच्या ३१ ठिकाणी या ट्रेनला थांबे आहेत. या ट्रेनमुळे तीर्थक्षेत्र पर्यटन, कनेक्टिव्हिटी सुधारणार आहेच. त्याशिवाय मार्गाच्या आसपासच्या परिसरातल्या आर्थिक विकास वाढणार आहे. नवीन रेल्वेगाडीमुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि सिकंदराबाद या परिसरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच यामुळे परळी वैजनाथ हे शिवभक्तांसाठी महत्त्वाचं असलेले तीर्थक्षेत्रदेखील जोडले जाणार आहे.
शिर्डी,कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी,लातूर रोड आणि उदगीर या स्थानकावर शिर्डी-तिरूपती एक्सप्रेस ट्रेन थांबणार आहे.
तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा प्रारंभ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील रेल्वेचा प्रवास सुसाट होणार आहे. आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टी भागापासून भाविकांना शिर्डीला घेऊन जाणारी पहिली थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. तिरुपती आणि शिर्डी या भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना थेट जोडणाऱ्या या सेवेमुळे यात्रेकरूंची अधिक चांगली सोय होणार आहे.


