अहिल्यानगर-नगरविकास विभागाने मंगळवारी रात्री उशिरा प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, उपायुक्त व सहायक आयुक्त या संवर्गातील अधिकार्यांच्या पदोन्नती व बदल्यांचा आदेश जारी केला. या आदेशानुसार अहिल्यानगर महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ घडली आहे.महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंढे व संतोष टेंगले यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवीन अधिकार्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांची बदली नाशिक महानगरपालिकेत परिवहन व्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे, तर टेंगले यांची नियुक्ती पुणे महानगरपालिकेत सहायक आयुक्त या पदावर झाली आहे. सहायक आयुक्त सपना वसावा यांची तात्पुरत्या स्वरूपात पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पारनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांची राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची नाशिक महानगर प्रादेशिक प्राधिकरणात सहआयुक्त म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यात शिर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. याशिवाय, परतूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


