Tuesday, March 3, 2026

तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; अपंगांना १५ हजारांचे अर्थसहाय्य

मुंबई : अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक साधने (टूलकिट) खरेदीसाठी आता कमाल १५ हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने घेतला आहे. आजपर्यंत या योजनेद्वारे फक्त एक हजार अर्थसहाय्य देण्यात येत होते. या योजनेमुळे अपंग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय उभारण्यास मोठी मदत होईल, असे विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे म्हणणे आहे.
अपंग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर, इलेक्ट्रिकल कामे, सुतारकाम, वाहन दुरुस्ती असे किरकोळ व्यवसाय करण्यास इच्छुक असतात. मात्र आवश्यक साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना अडचणी येतात. महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र, २०४७ या कृती आराखड्यातील अपंग सक्षमीकरणविषयक रोजगार व स्वयंरोजगार या ध्येयाचा एक भाग म्हणून शासनाने ही योजना कार्यान्वित केली आहे.
ही योजनाअपंगांच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू असून प्रशिक्षित अपंग अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. या योजनेमध्ये प्रशिक्षित अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येत असून निधी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यात येणार आहे. निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करण्यात येईल.
ही योजना अपंग व्यक्तींना उद्योजकतेकडे प्रवृत्त करून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनास चालना देणारी ठरणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी अपंग सक्षमीकरण विभागाच्या https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून या योजनेकरिता नोंदणी करावी व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles