अहिल्यानगर-दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सावेडी उपनगरातून दोन अल्पवयीन मुली घरातून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याच्या संशयावरून पालकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.सावेडी उपनगरात राहत असलेल्या एका डॉक्टर महिलेने (वय 42) दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी (वय 17) ही गुरूवारी (16 ऑक्टोबर) सायंकाळी ‘मी बाहेरून येते’ असे सांगून घराबाहेर पडली, मात्र त्यानंतर ती परत आली नाही. फिर्यादीची मुलगी नाशिक येथे बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असून ती आई-वडिलांसोबतच अहिल्यानगरात राहते. रात्री उशिरापर्यंत ती न आल्याने फिर्यादीने मुलीचा मित्र रितेश सतीश मुथ्था (रा. पाथरवाला, ता. नेवासा) याच्याशी संपर्क साधला. मात्र त्याने ‘मला काही माहिती नाही’ असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर त्याचा फोन बंद येऊ लागला. फिर्यादीने रितेशच्या वडिलांनाही विचारणा केली असता, रितेशने आजीला फोन करून पैशांची मागणी केली होती असे त्यांनी सांगितले. या सगळ्या घडामोडीनंतर फिर्यादीच्या मुलीला रितेश मुथ्था याने फुस लावून पळवून नेल्याची खात्री असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी घटना सावेडी उपनगरात घडली आहे. सध्या सावेडी उपनगरात राहत असलेल्या व मुळच्या नेवासा तालुक्यातील रहिवासी 42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी (वय 16) ही शुक्रवारी (17 ऑक्टोबर) रात्री अचानक घरातून बेपत्ता झाली. त्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जेवण करून झोपले होते. मध्यरात्री फिर्यादीला जाग आल्यावर मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी आसपास, नातेवाईकांकडे आणि शहरात शोध घेतला, पण मुलगी कुठेच सापडली नाही. मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


