शेवगाव -महसूल खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोघा तरुणांची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेवगाव येथील शिवसेनेची पदाधिकारी विद्या भाऊराव गाडेकर हिच्यासह तिचे वडील आणि इतर एकाच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. 16) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौतम अर्जुन दौंड (वय 35, रा. हातराळ, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली असून, विद्या गाडेकर हिच्यासह तिचे वडील भाऊराव भानुदास गाडेकर (दोघे रा. शेवगाव) व श्यामराव विश्वंभर लोकरे (रा. निलंगा, जि. लातूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 जुलै 2014 रोजी नोकरीचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली.
विद्या गाडेकर व भाऊराव गाडेकर यांनी फिर्यादी गौतम दौंड व त्याचे काका सुभाष किसन आव्हाड यांना 20 जुलै 2014 रोजी नोकरीचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली. गौतम याच्यासह त्याच्या काकाच्या मुलाला नोकरी देण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार गौतम व त्याच्या काकांनी गाडेकर हिने दिलेल्या बँक खात्यात 22 जुलै 2014 रोजी दोन टप्प्यात दीड लाख रुपये भरले. तसेच मुंबईतील श्यामराव विश्वंभर लोकरे हे नोकरीचे काम करून देणार असल्याचे गाडेकर हिने सांगितले. त्यानंतर 7 जानेवारी 2015 रोजी गाडेकर यांच्या शेवगाव येथील राहत्या घरी रोख स्वरूपात आठ लाख रुपये दिले.
पुन्हा 18 एप्रिल 2015 रोजी 1 लाख रुपये दिले. पैसे देऊनही नोकरीचे काम होत नसल्याने दौंड यांनी गाडेकर हिला पैसे मागितले असता, गाडेकर ही दौंड यांना मुंबईला घेऊन गेली. तेथे लोकरे यांची भेट घालून देत त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, बँकेत तो वटला नाही. त्यानंतर दिलेले दोन धनादेशही वटले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.


