राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असतानाच, शिंदे गटाच्या एका खास मेजवानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिंदे सेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’ला चक्क शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन बड्या खासदारांनी हजेरी लावली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.
1. नागेश आष्टीकर (खासदार, नांदेड)
2. संजय देशमुख (खासदार, यवतमाळ–वाशिम).
या दोन खासदारांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या गळाला लागल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार हे शिंदेंसेनेच्या खासदाराच्या घरी पोहचले होते. २ खासदार ठाकरेंची साथ सोडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. ठाकरेंच्या सर्व खासदारांना याचं आमंत्रण होते. या कार्यक्रमाला कुणीही जाणार नाही, अशी चर्चा सुरू होती. पण खासदार सहभागी झाले. खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी या मेजवानीला हजेरी लावली. त्यांच्या या हजेरीमुळे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय.


