“आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे”, असं आवाहन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी साद घातली आहे. राज ठाकरेंच्या या टाळीवर आता उद्धव ठाकरेंनीही हाळी दिली आहे. मात्र, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. उद्धव ठाकरे आज श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ, दादर येथे आयोजित केलेल्या भारतीय कामगार सेनेच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
“किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आमच्यात भांडण नव्हतंच, पण तरीही आमच्यातील भांडणं मिटवून टाकल्याचं मी जाहीर करतो. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर यायचं. मग काय द्यायचाय त्या तो पाठिंबा बिनशर्त द्या. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्थ माझी आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“पण मग बाकीच्यांना गाठीभेटी आणि कळत नकळत प्रचार करायचा नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची. आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची”, असंही ते राज ठाकरेंना म्हणाले.


