गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका केव्हा पण लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असून, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणुका लढवण्याचे संकेत मिळत आहेत. याला कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या भेटीगाठी होय.राज्य सरकारने राज्यात हिंदी सक्ती लादण्याचा निर्णय घेत प्रथम राज आणि उद्धव ठाकरेंनी त्याला कडाडून विरोध दर्शविला होता. यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर घेतलेल्या विजयी मेळाव्यात दोन्ही बंधू तब्बल १८ वर्षांनी एकत्र आले होते. यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. तर उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनास गेले होते.
त्यानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील दिसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “कदाचित राज ठाकरेंना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते”, असे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी आवश्यक आहे. ही जनभावना आहे. आता गणेशोत्सव संपल्यावर पितृपक्ष सुरु होत आहे. दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दसरा मेळाव्यात आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला सामोरे कसे जायचे, याविषयी मार्गदर्शन करतील. दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे”,असेही सचिन आहिर यांनी म्हटले आहे .
तसेच “दसरा मेळाव्याला दोघे बंधू व्यासपीठावर एकत्र येतील का ते माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. आमच्याप्रमाणेच त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे तेदेखील आम्हाला आमंत्रित करु शकतात. पक्षाचं आणि आघाडीचं व्यासपीठ वेगळं असतं. परंतु, यावेळचा शिवतीर्थवरील दसरा मेळावा हा ‘न भूतो न भविष्यती’, स्वरुपाचा असेल, असेही आमदार सचिन आहिर म्हणाले.


