सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर केली. सरकारनं जाहीर केलेली मदत पुरेशी आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केला आहे.
“माझं सरकार असताना मी तुम्हाला नुकसानभरपाई दिली होती. आज माझ्या हातात काही नाही. परंतु सरकारकडे मी तुमच्या मागण्या नक्की मांडेन,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं.
“खचून जाऊ नका आणि वेडंवाकडं पाऊल उचलू नका. तुमच्या मागण्या मी सरकारसमोर मांडेन. आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं.
लातूर जिल्ह्यातील कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी आज पाहणी केली तसेच शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला, त्यांची व्यथा जाणून घेतली.
उभं पीक पाण्याखाली गेलंय आणि शेतीच्या बांधावरून बळीराजा मदतीसाठी सरकारकडे आक्रोश करतोय पण सरकार मात्र मदतीची कोणतीच ठोस शाश्वती देत नाहीय, अशावेळी बळीराजाने करायचं काय?
ह्या दौऱ्यादरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी उपस्थित होते.


