अहिल्यानगर : गणेश विसर्जनानंतर ट्रॅक्टर वळविताना तो उलटल्याने त्याखाली सापडून तरुण बांधकाम अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील टाकळी खातगाव शिवारात ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. संतोष काशिनाथ पादीर (वय ३१, रा. टाकळी खातगाव, ता.नगर) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.
संतोष पादीर हे बांधकाम व्यावसायिक होते. टाकळी खातगाव आणि हिवरे बाजार गावाच्या हद्दीमध्ये पादीरवाडी येथे पाझर तलाव आहे. पादीर हे ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी मित्रासमवेत गणेश विसर्जनासाठी पादीरवाडी तलावात गेले होते. गणेश मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ते ट्रॅक्टर वळवित असताना उतरावरून ट्रॅक्टर तलावाच्या दिशेने उलटला. ते ट्रॅक्टरच्या खाली सापडले. त्यांच्या मित्र परिवाराने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष गौरव नरवडे यांचे ते निकटवर्तीय होते.