Saturday, November 1, 2025

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

सुरत – चेन्नई आंतरराष्ट्रीय महामार्गालगतच्या जागेवर औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क उभारल्यास जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार
– केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

अहिल्यानगर, – सुरत ते चेन्नई हा १ हजार ६०० किलोमीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग असून त्यापैकी सुमारे ४८१ किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार आहे. या रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने जागा संपादन करून औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क उभे केल्यास पाचही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

३२६ कोटी रुपये किंमतीच्या नांदूर शिंगोटे ते कोल्हार १६० डी राष्ट्रीय महामार्गाच्या ४७ किलोमीटरच्या रस्त्याची सुधारणा, ७५० कोटी रुपयांच्या नगर – सबलखेड – आष्टी – चिंचपूर ५० किलोमीटरचा रस्ता, ३९० कोटी रुपयांच्या बेल्हे – अलकुरी – निघोज – शिरूर या ३८ किलोमीटर, आणि ११ कोटी रुपये किंमतीच्या श्रीगोंदा शहरातील पुलाच्या कामाचा अशा एकूण १ हजार ३८० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार मोनिका राजळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रशांत फेगडे, अधीक्षक अभियंता दयानंद विभूते आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, सुरत ते चेन्नई हा हरितमार्गावरील १ हजार ६०० किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे. या रस्त्यामुळे सुरत ते चेन्नई हे अंतर ३२० किलोमीटरने तर नाशिक ते सोलापूर हे अंतर १३५ किलोमीटरने कमी होणार आहे. भारतमाला प्रकल्प रद्द झाल्याने या रस्त्याच्या भूसंपादनासाठी नवीन प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात या प्रकल्पाला मान्यता मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच या रस्त्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्यांना याचा मोबदला तातडीने वितरण करून रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे -‌ अहिल्यानगर या बीओटी तत्त्वावरील रस्ता असल्याने या रस्त्याच्या कामासाठी अडचण येत होती. परंतु बीओटी रस्त्याची मुदत संपल्याने राष्ट्रीय महामार्गाने रस्त्याचा कामाचा डीपीआर तयार करण्यात येत असून उपलब्ध जागेनूसार हा रस्ता सहा पदरी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच नगर – करमाळा – टेभुर्णी‌ – सोलापूर या ८० किलोमीटर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १ हजार १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून कामाची निविदाही निश्चित करण्यात आली आहे. सीआरएफ मध्ये २७१ कोटींची २५ कामे असून २५ कोटी रुपयांची ३ कामे यावर्षी सुरू होत असल्याचेही ते म्हणाले.

अहिल्यानगर – शिर्डी या रस्त्याचे काम घेतलेल्या व ते पूर्ण न केलेल्या ३ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. त्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याची सूचना करत या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वासही श्री.गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

गतकाळात जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी केवळ २०२ किलोमीटर एवढी होती. परंतु विद्यमान शासनाच्या काळात रस्ते विकासाची ८७० किलोमीटरची कामे केल्याने ती आता १ हजार ७१ किलोमीटर झाली आहे. जिल्ह्यात ६ हजार २०८ कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात आली असून ३ हजार ५०० कोटी रुपयांची कामे प्रगतीत आहेत. १ हजार ५०० कोटी रुपयांची कामे नव्याने मंजूर करण्यात आली आहे, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, रस्ते विकासाची अशक्य वाटणारी कामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पकतेतून पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मालाची कमी वेळेत वाहतूक केल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल. नाशिक येथे आगामी काळात आयोजित सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक भाविक अहिल्यानगरसह शिर्डीमध्ये येणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर – शिर्डी या रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घेऊन हे काम वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत कसाराफाटा ते कोल्हार पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

1 COMMENT

  1. I think this is among the most vital info for me. And i am glad reading your article. But should remark on some general things, The website style is ideal, the articles is really great : D. Good job, cheers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles