Saturday, December 6, 2025

वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; मंत्री पंकजा मुंडे गहिवरल्या

बीड जिल्ह्यातील परळी येथील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अखेर ओंकार साखर कारखान्याने खरेदी केला आहे. या कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाचा शुभारंभ आज राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला कारखान्याचे चेअरमन बोत्रे पाटील, संचालक मंडळ सदस्य आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परळी, अंबाजोगाई, पांगरी परिसरात स्थानिक पातळीवर ऊस प्रक्रिया सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभारला होता.
या कारखान्याचे साडेसात हजारांहून अधिक संस्थापक सभासद आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून बँक कर्जबोजा, थकबाकी आणि आर्थिक अडचणींमुळे कारखान्यावर दिवाळखोरीची वेळ आली. परिणामी युनियन बँकेने हा कारखाना ओंकार साखर कारखान्याला विक्री केला.

गाळप शुभारंभ सोहळ्यात बोलताना मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “आम्ही या ठिकाणी आल्यावर बाबा आम्हाला नेहमी काहीतरी सांगायचे. माझा मुलगा तेव्हा दीड वर्षांचा होता… त्याला त्यांनी साखरेच्या पोत्यात ठेवले होते, अशी आठवण करून देत त्या गहिवरल्याचे पाहायला मिळाले. वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या, अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर भावनिक वातावरण निर्माण झाले

दरम्यान, वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या विक्रीविरोधात रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप केला होता की, कारखाना विक्रीचा निर्णय कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेण्यात आला. कारखाना 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आला असून, 14 ऑगस्ट 2025 रोजी अंबाजोगाई येथील रजिस्ट्री कार्यालयात ही नोंद करण्यात आली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी परळी तालुक्यातील कारखाना अंबाजोगाईमध्ये कसा विकला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित केला होता. याशिवाय, करारावर पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाच्या सह्या असल्या तरी त्यांच्या बहिणी यशश्री मुंडे यांची सही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यशश्री मुंडे यांनी हा व्यवहार मान्य केला नव्हता का? असा सवालही त्यांनी विचारला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles