माजी महापौर अभिषेक कळमकर अटकेच्या मागणीसाठी पीडितेचा आक्रोश; आत्मदहनाचा इशारा
गुन्हा दाखल होऊनही आरोपी फरार; पीडित कुटुंब भीतीच्या छायेत
25 मार्चपर्यंत अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर टोकाचा निर्णय
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माजी महापौर अभिषेक कळमकर याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, आरोपीला लवकरात लवकर अटक न झाल्यास येत्या 25 मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही संबंधित महिलेने दिला आहे.
पीडितेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 (1), 64 (2) (M), 69 (2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (E) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीत आरोपीने एम.आय.डी.सी. परिसर, विळद घाट तसेच शिरूर येथे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तसेच, आरोपीने पीडितेला व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देत तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि व्हिडिओ कॉलद्वारे धमकावून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होऊन जवळपास एक महिना उलटूनही आरोपी अद्याप अटकेत नसल्याने पीडित महिला व तिचे कुटुंब भयभीत अवस्थेत जीवन जगत आहेत. आरोपी फरार असल्याची माहिती माध्यमांतून समजत असल्याचे सांगत पीडितेने आपली भीती व्यक्त केली आहे. “जर आरोपी पोलीसांच्या ताब्यात नसेल, तर तो किंवा त्याचे सहकारी आमच्यावर कुठलाही घात करू शकतात,” अशी भीती तिने व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने पोलीस प्रशासनाकडे विनंती करत, आरोपीला तात्काळ अटक करून तिला व तिच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, 25 मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देत, त्यानंतर घडणाऱ्या कोणत्याही घटनेसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
माजी महापौर अभिषेक कळमकर अटकेच्या मागणीसाठी पीडितेचा आत्मदहनाचा इशारा
- Advertisement -


