अहिल्यानगर -फेसबुकवर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका तरुणाने विवाहितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केल्यानंतर संशयित आरोपी तिला वाऱ्यावर सोडून पसार झाला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील रहिवासी असलेल्या एका विवाहितेची ओळख सन २०२४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सारंगपूर येथील राजू भाऊराव काकडे ऊर्फ सुनील पटेल याच्याशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि संशयित आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १ फेब्रुवारी रोजी रात्री राजू काकडे पीडितेच्या घराच्या परिसरात आला आणि तिला भेटायला बोलावून दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेला.
संभाजीनगर येथील एका लॉजवर त्याने पीडितेशी लग्नाचे आमिष दाखवून तिची संमती नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा आणण्याच्या बहाण्याने संशयित आरोपीने पीडितेचा मोबाईल स्वतःच्या खिशात ठेवला आणि तिथून पळ काढला. बराच वेळ वाट पाहूनही तो परत न आल्याने पीडितेने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. अहिल्यानगर पोलिसांनी बेपत्ता असलेल्या विवाहितेचा शोध घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू काकडे याच्याविरुद्ध फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


