भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ततीची घोषणा केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला जिवंत केले होते, त्यामुळे विराट कोहलीने आताच निवृत्ती घेऊ नये, असे अनेक चाहत्यांची भावना होती. बीसीसीआयनेही याबाबत विराट कोहलीच्या मनधरणीचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीने निवृत्ती घेतली आहे. विराट आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची कसोटी लागणार आहे.
मागील १४ वर्षांपासून भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळत आहे. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमुळे माझा प्रवास कुठे जाईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. कसोटी क्रिकेटने मला घडवलं आणि आयुष्यभर जपून ठेवावे असे धडे दिले. पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळण्यात काहीतरी खूप वैयक्तिक आहे. शांतपणे मेहनत, मोठे दिवस, आणि त्या छोट्या क्षणांचा अनुभव ज्याला कोणी पाहत नाही पण त्या तुझ्यासोबत कायम राहतात.
या फॉरमॅटपासून दूर जाताना मन जड आहे — पण हे योग्य वाटतं. मी माझं सर्व काही दिलं, आणि याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने पुढे जात आहे — या खेळासाठी, ज्यांच्यासोबत मी मैदानावर खेळलो त्या माणसांसाठी, आणि मला प्रत्येक टप्प्यावर आधार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी.मी माझ्या टेस्ट करिअरकडे नेहमी हसतमुखाने पाहीन.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. ११३ कसोटी सामन्यांत त्याने ८,८४८ धावा केल्या, सरासरी ४९.१५. यात २७ शतके आणि ३० अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोअर २५४* आहे. कर्णधार म्हणून ६८ सामन्यांत ४० विजय मिळवले, जे भारतासाठी विक्रमी आहे. त्याच्या आक्रमक शैलीने आणि फिटनेसने संघाला नवी उंची दिली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या देशांत त्याने महत्त्वपूर्ण खेळी केल्या. क्षेत्ररक्षणातही तो उत्कृष्ट आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आणि नेतृत्वाने त्याला आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज बनवले आहे.
विराट कोहली युग थांबले –
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतके ठोकली आहेत. त्याचे पहिले कसोटी शतक 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड येथे (116) आले होते. सर्वोच्च स्कोअर 254* (2019, दक्षिण आफ्रिका, पुणे) आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4, इंग्लंडविरुद्ध 5, वेस्ट इंडिजविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2, श्रीलंकेविरुद्ध 4 आणि बांगलादेशविरुद्ध 1 शतक केले. परदेशात 12 आणि भारतात 15 शतके झाली. कर्णधार असताना त्याने 20 शतके केली आहेत.


